पक्ष प्रवेशानंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जंगी स्वागत
डोंबिवली दि. २४ डिसेंबर :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचा आपण निर्धार केल्याची भावना भाऊ चौधरी यांनी काल डोंबिवलीत व्यक्त केली. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे खंदे समर्थक असणाऱ्या भाऊ चौधरी यांनी नुकताच एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेत आलेल्या भाऊ चौधरी यांचे पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.
डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जंगी स्वागत…
काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमूख पद भूषविलेल्या आणि शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाऊ चौधरी यांच्यावर ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख पद होते. तर खासदार संजय राऊत यांचे ते अत्यंत निकटवर्तीय आणि खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर काल संध्याकाळी भाऊ चौधरी यांनी काल संध्याकाळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेला भेट दिली. यावेळी शहरप्रमूख राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे जंगी स्वागत केले.
अनेक वर्षांमध्ये जी कामं होत नव्हती ती गतिमानतेने होताना बघतोय..
यापूर्वीही आपण शिवसेनेत काम करत होतो आणि आत्ताही शिवसेनेतच काम करत आहे. आपण दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेली नसून शिवसेनेची ध्येयधोरणं पुढे नेण्याचं काम करत असल्याची प्रतिक्रीया भाऊ चौधरी यांनी यावेळी दिली. तसेच ग्रामीण भागामध्ये मागच्या अनेक वर्षांमध्ये जी कामं होत नव्हती ती गतिमानतेने होताना बघतोय. संपूर्ण राज्याचं मुख्यमंत्र्यांना समर्थन मिळतंय, कार्यकर्ते येताहेत, सगळे जोडले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखली आपण काम सुरू करून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार राज्याच्या काना कोपऱ्यात पोहचवू असेही चौधरी यांनी सांगितले.