Home ठळक बातम्या डोंबिवली ते बदलापूर पट्ट्यात गेल्या १० वर्षांतील सर्वात उष्ण डिसेंबरची नोंद

डोंबिवली ते बदलापूर पट्ट्यात गेल्या १० वर्षांतील सर्वात उष्ण डिसेंबरची नोंद

 

डोंबिवली ते बदलापूर पट्ट्यात ‘ऐन सर्दीमध्येच गर्मीचा एहसास ‘

कल्याण – डोंबिवली दि. १७ डिसेंबर :
डोंबिवलीपासून ते बदलापूर पट्ट्यासाठी यंदाचा डिसेंबर महिना चांगलाच तापदायक ठरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या गर्मीमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले असून डोंबिवलीपासून ते बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यात आज गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर यंदाचा डिसेंबर महिना हा दहा वर्षांतील सर्वाधिक उष्ण डिसेंबर महिना ठरल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

गेल्याच आठवड्यात १० ते १२ अंश सेल्सिअस किमान तापमान…

डिसेंबरच्या गेल्याच आठवड्यात कल्याण डोंबिवलीसह बदलापूरपर्यंतचा तापमानाचा पारा चांगलाच खाली आला होता. ही गुलाबी थंडीची चाहूल समजून नागरिक चांगलेच आनंदी झाले होते. मात्र त्यांचा हा आनंद काही फार दिवस टिकलेला दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या किनार पट्टीवर अचानक वादळ येऊन धडकले आणि या वादळाने संपूर्ण तापमानाची दिशाच बदलून टाकली. गेल्या शनिवारी डोंबिवली ते बदलापूर पट्ट्यामध्ये नोंदवले गेलेले १० ते १२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र या वादळामुळे उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या हवेचा रोख बदलून ही हवा पूर्वेकडून वाहण्यास सुरुवात झाली. परिणामी डिसेंबर महिना असूनही लोकांवर ऑक्टोबर हीटप्रमाणे घामाघूम होण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया अभिजीत मोडक यांनी दिली.

म्हणून १० वर्षातील उच्चांकी तापमान डिसेंबरमध्ये…

याआधी भाकीत केल्याप्रमाणे पूर्वेकडूनकडून येणारी हवा आणि आर्द्रता वाढल्याने अंशतः ढगाळ हवामानामुळे थंडी गायब होऊन ऑक्टोबर हीटप्रमाणे गर्मी जाणवत आहे. मागील आठवडय़ात बंगालच्या उपसागरात मैंडूस चक्रीवादळाने तामिळनाडू किनारा पार करत आपली वाटचाल अरबी समुद्राकडे सुरू ठेवली. आणि त्यामुळे अरबी समुद्रात पुन्हा अती तीव्रतेचे कमी दाबाचे क्षेत्रात रुपांतर झाले. जरी ते भारताच्या किनारपट्टीपासून लांब गेले असले तरी त्यांनी जमिनीवरील पूर्व हवा सक्रीय करत आर्द्रता वाढवली. आणि त्यावर कहर म्हणजे त्यांनतर मुंबईजवळ कालच एक उच्च हवेचा दाब जमिनीपासून ३-४ की.मी वर तयार झाला. ज्यामुळे आधीच वाढलेले इथले तापमान अजून वाढ होण्यात मदत झाली. पूर्वेकडील हवा अजून सक्रीय झाल्यानेच आपल्याकडे गेल्या १० वर्षातील उच्चांकी तापमान डिसेंबरमध्ये नोंदवण्यात आल्याची माहिती मोडक यांनी दिली.

२० तारखेपासून पुन्हा एकदा थंडीची चाहूल…

तसेच पुढील दोन दिवस म्हणजेच येत्या १९ डिसेंबरपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाजही त्यांनी यावेळी वर्तवला. येत्या २० तारखेपासून तापमानात हळूहळू घट अपेक्षित असून थंडीची चाहूलही जाणवायला लागेल. आताच्या अभ्यासानुसार उत्तरेकडील भागात येणारे पश्चिमी विक्षोभ आपल्या इथे वार्‍याची दिशा बदलून पुन्हा उत्तर / पश्चिम होऊन कोरड्या हवेमुळे नाताळच्या आसपास तापमानात घट दिसून येऊ शकते असेही अभिजीत मोडक यांनी स्पष्ट केले.

आज नोंदवण्यात आलेले किमान तापमान

बदलापूर – ३६.३
कल्याण – ३६.३
डोंबिवली ३६.१
ठाणे ३६.२
कर्जत ३८.५
नवी मुंबई ३५.८
मुंबई ३५.९

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा