कुपोषण निर्मूलनाच्या निधी उभारणीसाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईडतर्फे आयोजन
डोंबिवली दि. ५ डिसेंबर :
कुपोषण निर्मूलनाच्या निधी उभारणीसाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांच्या ‘सलाम आशा’ कार्यक्रमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून डोंबिवलीतील सावित्रीबाई फुल नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवलीतील रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
कुपोषण निर्मूलनासाठी निधी उभारण्याचा उद्देश…
मुरबाड तालुक्याच्या आदिवासी भागात कुपोषण निर्मूलनासाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडतर्फे गेल्या ८ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या प्रयत्नांना आता बऱ्याचअंशी यश आले असले तरी आर्थिक कमतरतेमुळे हा उपक्रम राबविण्यात काही अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर कुपोषण निर्मूलनासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडतर्फे ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती अध्यक्ष डॉ. अनंत इटकर यांनी दिली.
गाण्यांना रसिक श्रोत्यांची मोठी दाद…
यावेळी चित्रपटसृष्टीतील चिरतरुण पार्श्वगायिका अशी ओळख असलेल्या आशा भोसले यांची मराठी आणि हिंदी भाषेतील गाजलेली गाणी ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांच्यासह मानसी केळकर – तांबे आणि महेश कंटे या गायकांनी सादर केलेल्या गाण्यांना रसिक श्रोत्यांची मोठी दाद मिळाली. तसेच सिद्धार्थ कदम यांनी केलेल्या ढोलकी वादनावर उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट करत कौतूकाची थाप दिली. तर प्रसिद्ध आरजे आणि निवेदक अमित काकडे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण आणि खुमासदार सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली.
यावेळी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कैलास जेठानी, भावी डीजी मिलिंद कुलकर्णी, म्हात्रे ग्रुपचे सुरेश म्हात्रे, जीएनपी ग्रुपच्या कांचन शिंदे , रोहित धरोलीया आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान कुपोषण निर्मूलनाच्या निधी उभारणीसाठी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रसिक श्रोत्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केल्याचे यावेळी दिसून आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. अनंत इटकर, सचिव सागर महाजन, प्रोजेक्ट चेअरमन डॉ अवधूत शेट्टी, वैभव ठाकरे यांच्यासह सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठी मेहनत घेतली.