महापालिका आयुक्तांची भेट घेत दिले निवेदन
कल्याण दि.26 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय सेवांअभावी रुग्णांचे हाल होत असून आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी ब्लॅक पँथर पक्षातर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
ठाणे जिल्ह्यातील मनपा शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना आरोग्य उपचार विषयक सुविधांच्या अभावामुळे भयंकर त्रास होतो, तसेच त्यांची हेळसांडही होते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी याची दखल घेवून त्वरित संबंधितांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची आग्रही मागणी यावेळी ब्लॅक पँथरतर्फे करण्यात आली.
तसेच सध्याची राजकारणाची दुर्दशा आणि दिशाहीन झालेल्या राजकारणामुळे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून ब्लॅक पँथर जनहितासाठी ठाणे – मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असल्याची माहिती ठाणे जिल्हाध्यक्ष अजय कांबळे यांनी दिली. तसेच केडीएमसी रुग्णालयांत आवश्यक असणाऱ्या आरोग्य सुविधा लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ब्लॅक पँथर पक्षातर्फे देण्यात आला आहे.
यावेळी कल्याण तालुका अध्यक्षा अनिता सुतार, कल्याण शहर (पूर्व) अध्यक्षा छाया मांजरेकर, पिसवली कल्याण (पूर्व) शाखा अध्यक्ष गजानन उमप, लोकग्राम कल्याण (पूर्व) शाखा अध्यक्ष संजय ऐवले, चिंचपाडा कल्याण (पूर्व) शाखा अध्यक्ष प्रशांत पाठारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.