कल्याण लोकसभा मतदारसंघातील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन
डोंबिवली दि.१३ नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आम्ही बरेच प्रकल्प करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डोंबिवली पूर्वेतील नांदिवली स्वामी समर्थ मठ परिसरात झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रासह कल्याण डोंबिवलीच्या विकासाचा रोडमॅप सादर केला.
कल्याण डोंबिवलीला चांगले करण्यासाठी आवश्यक ते सर्व करणार…
कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी आणखी मोठ्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शीळ फाटा रस्त्याला पर्यायाचा विचार करत आहोत. शिळ फाटा ते भिवंडी मल्टिलेव्हल रस्ता करणार आहोत. या शहरानाआणखी चांगले करण्यासाठी जे जे करता येईल ते करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. हे सरकार लोकांचे असून लोकांसाठी जे जे करता येईल ते करण्यासाठी आपण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य…
राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमएमआर क्षेत्रात मेट्रोमुळे खासगी वाहनांपाठोपाठ प्रदूषणही कमी होणार…
राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. खड्डेमुक्त रस्ते हे या शासनाचे ध्येय आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते असावे ही जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे रस्ते करण्यावर भर देत आहोत. राज्यात समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, वसई विरार मल्टिमोडल रोड असे अनेक प्रकल्प राज्य शासनाने प्राधान्याने घेतले असून ते वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. मुंबई पुणे महामार्गावर जगातील रुंदीने सर्वात मोठा टनेल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात येत आहे. असे प्रकल्प राज्यासाठी कायापालट करणारे आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या जाळ्यामुळे खासगी वाहने कमी होऊन प्रदूषण कमी होईल. एमएमआरडीए ला प्रकल्पासाठी साठ हजार कोटींच्या निधींसाठी परवानगी दिली आहे.
सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
सबका साथ सबका विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १८ तास झटत आहेत. सामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आनंदाचा शिधा वाटप केले. पुढील चार सणांनासुद्धा हा शिधा वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कल्याण डोंबिवलीमधील सर्व रस्ते लवकरच सिमेंटचे करण्यात येणार आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम हे शासन करत आहे. विकासाचे रथ घेऊन निघालेल्या या सरकारच्या पाठीशी सर्व जनतेने उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
येत्या काळात पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प उभे राहणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. या परिसरातील खड्डेमुक्त रस्त्यासाठी ४४५ कोटींची कामांचे भूमिपूजन आज करत आहोत. याशिवाय या भागासाठी शीळ फाटा ते रांजणोली रस्ता, शीळ फाटा येथे ग्रेड सेपरेटर, दुर्गाडी ते टिटवाळा रिंगरोड मोठगावपर्यंत आणणे, मेट्रो असे अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
कल्याण शीळ रस्त्याला पर्यायी मार्ग बनवण्याची गरज – आमदार राजू पाटील
तर कल्याण डोंबिवली क्षेत्रांचा वाढता आवाका लक्षात घेता कल्याण शिळ रस्त्याला पर्यायी मार्ग बनवण्याची गरज मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आम्ही सरकारवर टीका जरी करत असलो तरी ती केवळ विकासकामे आणण्यासाठी आणि लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी असते अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी जोडली.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, राजू पाटील, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, आदी उपस्थित होते.