मतदारांच्या पत्ता बदलाबाबत घेतली केडीएमसी आयुक्तांसोबत बैठक
कल्याण दि.7 नोव्हेंबर :
आपल्या देशात लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार दिला असून ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागात त्याला मतदान करता आले पाहिजे. यासाठी सेक्शनऐवजी प्रभागनिहाय मतदार याद्या बनवण्याची गरज केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणात व्यक्त केली आहे. मतदार यादीमधील मतदारांच्या झालेल्या अदलाबदलीबाबत त्यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
महापालिकेला सेक्शनवाईज मतदार याद्या तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्यानंतर त्यातील काही मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात आणि दुसऱ्या प्रभागाची तिसऱ्या प्रभागात गेली. परिणामी मतदार यादीमध्ये नाव असूनही संबंधित मतदाराला मतदान करता येणार नाही. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला निवेदन पाठवणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने निर्देश दिल्यास हा प्रश्न सुटेल..
तर विधानसभा निवडणुकीच्या याद्या लोकसभा आणि महापालिका निवडणुकीला वापरल्या जात असून शहरामध्ये मतदारांचे पत्ते सतत बदलत राहतात. म्हणून या याद्या प्रभागनिहाय बनवण्याची गरज असून तसे झाल्यास काहीच अडचण येणार नाही. महापालिकेच्या याद्या प्रभागानुसार अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यासाठी निर्देश दिले पाहिजेत. सेक्शनवाइज मतदार याद्या न करता प्रभागानुसार याद्या निर्माण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केडीएमसी आणि प्रांत अधिकाऱ्यांना दिल्यास हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
कोणत्याही भगिनीबद्दल अपशब्द वापरणे हे चुकीचे..
तर राज्यातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कपिल पाटील यांनी सांगितले की सत्तार काय बोलले हे आपल्याला माहिती नाही. परंतू कोणत्याही भगिनीबद्दल अपशब्द वापरणे हे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भारत जोडण्यासाठी तो तुटलाय कुठे…?
भारत जोडो हा काँग्रेसचा एक अजेंडा असून लॉजिकली विचार केल्यास भारत तुटला आहे कुठे की ते जोडायला निघाले आहेत असा प्रतिप्रश्न केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर भारत एकसंघ असून सगळ्या जगाने आता भारताच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. संपूर्ण जगात भारताची मान उंचावली असून भारताचे नावही आदराने घेतले जात असल्याचे सांगत भारत जोडो हा काँग्रेसचा केवळ अजेंडा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान केडीएमसी मुख्यालयात झालेल्या या बैठकीला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, माजी नगरसेवक वरुण पाटील, भाजप पदाधिकारी विकी गणात्रा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.