सर्व लाभार्थ्यांना वेळेत आनंदाची शिधा देण्याचे आमदार राजू पाटील यांचे आदेश
कल्याण ग्रामीण दि.21 ऑक्टोबर :
दिवाळीनिमित्त राज्य शासनातर्फे गोरगरीब जनतेसाठी सुरु करण्यात आलेल्या 100 रुपयांत शिधा किट वाटपाचा मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या योजनेच्या अंतर्गत कल्याण ग्रामीण मतदार संघातील १०८ दुकानांमधून ३६ हजार ४८८ गरजूंना या योजनेचा फायदा होणार आहे.
दिवाळीची सर्वत्र जोरदार तयारी सुरु असून बाजारपेठाही सजल्या आहेत. गरिबांनाही दिवाळीचा आनंद साजरा करता येण्यासाठी राज्य सरकारने १०० रुपयात रेशन कीट देणार असल्याची घोषणा केली होती. या योजनेचा शुक्रवारी कल्याण ग्रामीण मतदार संघातील भोपर गावात शुभारंभ झाला. दिवाळीपूर्वी सर्व सामान्यांना “आनंदाची शिधा” अल्प दरात उपलब्ध झाल्याने गरजूंनी आनंद व्यक्त केला आहे.
सर्व सामान्यांना देण्यात येणाऱ्या या आनंदाची शिधा किटमधील सर्व साहित्याची आमदार राजू पाटील यांनी पाहणी करण्यासह अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून या बाबतची माहितीही घेतली.
यावेळी शिधावाटप अधिकारी महेश कुसमुडे, सहाय्यक शिधावाटप अधिकारी रुचिका कोळवणकर, संदीप चौधरी, शिधा वाटप निरीक्षक विद्या प्रधान, प्रेम काळे, संतोष संसारे, शेख राणिक, माधवी यांजरेकर यांसह माजी नगरसेवक तुळशीराम चौधरी, काटई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काशिनाथ पाटील, अमर माळी,प्रसाद माळी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
योग्य नियोजन करून शासनाने जाहीर केलेले हे शिधा किट वेळेत पोहचेल याच योग्य नियोजन करा, तसेच केंद्र चालकांनी आणि अधिकाऱ्यांनी तशी काळजी घेण्याची सूचनाही आमदार राजू पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. आमदार आणि कल्याण ग्रामीण शिधा वितरण समितीचे अध्यक्ष या नात्याने धान्य वाटपावर पूर्ण लक्ष ठेवून आनंदची शिधा हा उपक्रम संपल्यानंतर संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचेही आमदार राजू पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.