वाचनवेड्या कुटूंबाची प्रेरणादायी कहाणी
केतन बेटावदकर
कल्याण दि. १४ ऑक्टोबर :
उद्या वाचन प्रेरणा दिन. देशाचे एक थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. परंतू आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जगामध्ये या पुस्तकांपासून आपली पिढी दूर झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र पुस्तकांशी असणारी ही नाळ पुन्हा जोडण्यासोबतच ती आणखी घट्ट होण्यासाठी कल्याणचं एक वाचनवेडं कुटूंब जे प्रयत्न करत आहे, त्यांचे कौतुक करावे तितके कमी ठरेल.
मुलांमध्येच नाही तर पालकांमध्येही वाचनाची कमी झालीय सवय…
पुस्तक वाचन हा एक असा संस्कार आहे जो वाचणाऱ्याचे केवळ आयुष्यच बदलत नाही तर त्याच्यामध्ये इतरांचे आयुष्य बदलण्याचीही ऊर्जा निर्माण करतात. आणि नेमका हाच धागा पकडून कल्याणातील विशाल कदम यांचे अख्खं कुटूंब वाचन संस्कृती जपण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालत आहेत. करिअर मार्गदर्शक आणि समुपदेशक असणाऱ्या विशाल वसंत कदम यांना केवळ मुलांमध्ये नाही तर पालकांमध्येही वाचनाची कमी झालेली सवय ही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे जाणवले. आणि मग यातूनच वाचन संस्कृतीच्या या लोक चळवळीची बिजं रोवली गेली. आणि या लोक चळवळीचा प्रारंभ त्यांनी आपल्या घरापासून, कुटुंबापासून करत आजोबांपासून ते नातवंडापर्यंतच्या सर्वांनी विशाल कदम यांना सक्रिय पाठिंबा दर्शवला.
वीस मिनिटे पुस्तक वाचन आणि उर्वरित दहा मिनिटे एकमेकांशी चर्चा…
लोकांमध्ये पुस्तकं वाचनाची पुन्हा आवड निर्माण व्हावी यासाठी दररोज सकाळी अर्धा तास सार्वजनिक ठिकाणी जाऊन एकत्रितपणे पुस्तक वाचन करतं. एवढेच नाही तर कोणी एखादा व्यक्तीने विचारणा केल्यास त्यालाही एक पुस्तक देऊन आपल्यामध्ये सहभागी करून घेतले जाते. दररोज नवी सकाळ, नविन लोकं पण ध्येय मात्र एकच. वाचन संस्कृतीची जोपासना. काय आहे की नाही कमाल या कुटुंबांची…? यामध्ये विशाल कदम यांचे वडील वसंत कदम, पत्नी सुदेष्णा कदम, मुलं कौशल कदम (१२ वर्षे ), विरज कदम (९ वर्षे ) आणि सहा वर्षांची मुलगी अभिन्या तसेच विशाल कदम यांचे बंधु डॉ. वैभव कदम, शेजारी राहणाऱ्या अनिला खापरे असे सर्व जण आता या वाचन चळवळीमध्ये सहभागी होत आहेत. दररोज सकाळी अर्ध्या तासापैकी वीस मिनिटे पुस्तक वाचन आणि उर्वरित दहा मिनिटे हे सर्व जण एकमेकांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी माहिती देतात. ज्यातून एकावेळी दोन पुस्तकांची माहिती एकमेकांना समजते.
मोबाईल दुष्परिणामातून बाहेर येण्यासाठी पुस्तकच मदत करणार – विशाल कदम
गेल्या काही वर्षात आपल्या हातातील पुस्तकांची जागा आधी टीव्हीच्या रिमोटने आणि आता मोबाईलने घेतलीय. पण टिव्हीच्या रीमोटपेक्षा मोबाईलचा विळखा इतका विखारी आहे की त्याचे लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या व्यक्तींवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होऊ लागले आहेत. त्याउलट पुस्तक वाचनातून मिळणारी प्रेरणा,ऊर्जा ही अत्यंत निर्मळ आणि तितकीच वाचकाची मनशक्ती वाढवणारी असते अशी प्रतिक्रिया यावेळी विशाल कदम यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान आजच्या या नकारात्मक विचार वाढत चाललेल्या जगामध्ये विशाल कदम कुटुंबियांनी पुस्तकं आणि वाचन संस्कृती जपण्यासाठी उचललेले हे ‘आस्ते कदम ‘ भविष्यात वाचनवेड्यांची नक्कीच एक चळवळ उभी करेल यात तिळमात्र शंका नाही. या संपूर्ण कुटुंबाला एलएनएन परिवारातर्फे मानाचा मुजरा.