राष्ट्रवादी काँग्रेस नाहक राजकरण करत असल्याचा आरोप
डोंबिवली दि.१ ऑक्टोबर :
केबल व्यावसायिक आत्महत्या प्रकरणाशी भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांचा कोणताही संबंध नसून राष्ट्रवादी काँग्रेसकडून दबावतंत्राचे राजकारण केलं जात असल्याची टीका कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
कल्याण ग्रामीणमधील संदप गावात राहणारे प्रल्हाद पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ट्रेनखाली आत्महत्या केली होती. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीसांनी भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.
त्यानंतर आता भाजपनेही राष्ट्रवादी विरोधात दंड थोपटले आहेत. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पदाधिकारी नंदू परब, नंदू जोशी, संदीप माळी यांचे भाऊ अमर माळी यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस दबाव तंत्राचे राजकरण करत असल्याचे सांगितले.
तसेच संदीप माळी यांचा या प्रकरणात काही एक संबंध नाही. राजकीय षड्यंत्रातूनच त्यांचं नाव या प्रकरणात गोवण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाणारी आंदोलने ही केवळ राजकीय हेतूपोटी सुरू आहेत. राष्ट्रवादीनेही असे आंदोलन करण्यापूर्वी याप्रकरणाची चौकशी करावी असे आवाहनही कांबळे यांनी यावेळी केले.