कल्याण दि.२८ सप्टेंबर :
देशातील अवघड स्पर्धांपैकी एक आणि नामांकित स्पर्धा अशी ख्याती असणाऱ्या सातारा हिल मॅरेथॉन २०२२ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दोघा अभियंत्यांनी चमकदार कामगिरी केल्याचे दिसून आले. देशभरातून या स्पर्धेमध्ये तब्बल ७ हजार स्पर्धक सहभागी झाले होते.
गेल्या आठवड्यात या सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल २१ किलोमीटर लांबीच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या क्षमतेचा चांगलाच कस लागतो. या स्पर्धेचा मार्ग हा सातारा शहरातून कास पठाराकडे जाणाऱ्या साडे दहा किलोमीटर अवघड वळण आणि चढणाचा असून त्यानंतर उर्वरित मार्ग हा साडेदहा किलोमीटर उताराचा आहे. ज्यामध्ये स्पर्धकांना आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून त्यात सहभाग घ्यावा लागतो.
त्यामध्ये केडीएमसीच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि जनि मनि विभागातील सहाय्यक अभियंता अजित देसाई हे दोघे सहभागी झाले होते. प्रशांत भागवत यांनी ३ तास २७ मिनिटे आणि १३ सेकांदामध्ये तर देसाई यांनी २ तास १८ मिनिटे आणि ४७ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली आहे.
त्याबद्दल या दोघाही अभियंत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.