आमदार विश्वनाथ भोईर यांनी सपत्नीक केली देवीची पूजा
कल्याण दि. २६ सप्टेंबर :
आजपासून प्रारंभ झालेल्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सपत्नीक देवीची पूजा करून त्यांच्या हस्ते आजची पहिली आरती संपन्न झाली.
कोवीडमूळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा नवरात्रौत्सव साजरा होत असल्याने लोकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवही मोठ्या थाटामाटात पार पडला असून त्याच उत्साहाचे प्रतिबिंब आजपासून सुरू झालेल्या नवरात्रौत्सवात दिसत आहे.
कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सवाला नागरिकांच्या मनात विशेष स्थान असून हा उत्सव म्हणजे एकप्रकारे गावाचा उत्सव म्हणून भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. आज पहिल्याच दिवशी किल्ले दुर्गाडीवरील देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
तर कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते यावेळी सपत्नीक देवीची पूजा आरती करण्यात आली. कल्याण शहरावर येणारे अनिष्ट संकट इडा पिडा टळू दे आणि इथल्या नागरिकांना उत्तम आरोग्य लाभू दे असे साकडे आपण देवीला घातल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान किल्ले दुर्गाडीवर नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील आणि त्यांचे इतर सहकारी अधिकारी स्वतः जातीने हजर राहून देखरेख करत आहेत.