डोंबिवली दि.२३ सप्टेंबर :
आज सगळीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. या सरकारच्या विकासकामांच्या गतीमुळे पुढील दोन वर्षांत आम्ही औषधालाही राहणार नाही अशी भीती विरोधकांना वाटायला लागल्याची टिका कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. डोंबिवलीत तुफान गर्दीत झालेल्या या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात खासदार शिंदे यांनी नाव न घेता विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
म्हणूनच शिंदे साहेबांनी उठाव करण्याचा निर्णय घेतला..
आपल्या भाषणात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की त्यांच्या सरकारमध्ये आमचे हात बांधले गेले होते. आपण सत्तेमधून बाहेर पडलो नसतो आणि तिकडे राहिलो असतो तर आपल्याबरोबर काय होणार ते आपल्याला दिसत होते. पण आपल्या नेत्याला मात्र ते दिसत नव्हते. म्हणूनच शिंदे साहेबांनी उठाव करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत तो चुकीचा असता तर आज महाराष्ट्रभर त्यांना मिळणारा जो अफाट प्रतिसाद आहे तो मिळाला असता का? असा प्रश्न खासदार डॉ. शिंदे यांनी उपस्थित केला.
सत्ता जाईल म्हणून हिंदूहृदय सम्राट बोलायचे नाही…
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे घोषवाक्य होते की, गर्व से कहो हम हिंदू है. या वाक्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात काही कारभार झाला का? जी आघाडी केली, त्या आघाडीमध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे बोलायलाही घाबरायचे असल्याचा गौप्यस्फोट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केला.
आज माझी खुर्ची दिसली तीही घरातील…
दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेल्या टिकेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तितक्याच ताकदीने उत्तर दिलेले पाहायला मिळाले. त्यांना आज माझी खुर्ची दिसली आणि तीदेखील घरातील. नेहमीप्रमाणे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपल्या घरी बसलो होतो. मात्र आपल्याच घरी बसायची देखील चोरी झाल्याचे सांगत आपल्या त्या ट्विटनंतर दुखावलेली मने ॲक्टीव्हेट झाल्याच्या शब्दांत खासदार डॉ. शिंदे यांनी राष्ट्रवादीवरती तोड डागली. या सर्व गोष्टी शोलेच्या डायलॉगनंतर सुरू झाल्या आहेत. हा शोले असाच ब्लॉक बस्टर हिट चालतच राहणार. लोकांनी आपल्याला अडीच लाख आणि साडे तीन लाख अशा मताधिक्याने दोन वेळा निवडून दिलं आहे. आपल्यालाही समजते की कुठे बसायचे ते. आजपर्यंत विरोधकांना शिंदे साहेबांची खुर्ची दिसत होती. मात्र माझ्या खुर्चीत काही नाही असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या आरोपांची हवा काढली.
या मेळाव्यावरून कळेल की शिवसेना कोणाच्या मागे खंबीर उभी आहे…
आजच्या कार्यक्रमाला झालेल्या तुफान गर्दीचा धागा पकडत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की आजच्या कार्यक्रमासाठी आपण कोणालाही बोलावले नाही की मीटिंग घेतली नाही. शिंदे साहेबांवर प्रेम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे हे प्रेम आहे. आपल्याला यावरून कळले असेल की शिवसेना कोणाच्या मागे खंबीर उभी आहे. तर एकनाथ शिंदे साहेब येतील तेव्हा कशा प्रकारे जल्लोष असेल याची कल्पना आपण या गर्दीवरून करू शकता अशी भावनाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.