तुफान गर्दीत झाला डोंबिवलीतील एकनाथ शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना मेळावा
डोंबिवली दि. २३ सप्टेंबर :
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एका कुटुंबाचे नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचे बाप होते. परंतू मला त्यांच्या विचारांची कीव वाटते. मात्र तुमच्यात जर एवढीच हिंमत असेल तर संपूर्ण हिंदुस्थानचे बाप असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून तुम्ही जनतेमध्ये जागृती दाखवा असे खुले आव्हान बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना केले. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातर्फे डोंबिवलीत झालेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात ते बोलत होते.
शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने काही जणांच्या पोटात गोळा…
शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने काही जणांच्या पोटात गोळा उठला आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांचे धाबे दणाणले तर अनेकांना आनंद झाला. मात्र काहींना दुःख याचेच की हा माणूस झोपतो तरी कधी? गणेशोत्सवात कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देण्यावरूनही त्यांनी टिका केली. परंतु एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पठडीत तयार झालेला कार्यकर्ता असून लोकांची रात्रंदिवस सेवा करण्याची आनंद मठाची परंपरा पुढे नेते असल्याचे गौरवोद्गारही दादा भुसे यांनी यावेळी काढले.
किती शिवसैनिकांना अडीच वर्षांत मातोश्री – मंत्रालय बघायला मिळाले..?
आम्ही गद्दार असतो तर एवढा मोठा महासागर आमच्यासोबत आला असता का? आम्हाला इतका लोकांचा पाठींबा मिळाला असता का? गेल्या अडीच वर्षांत किती जणांना वर्षा बंगला पाहायला मिळाला? किती शिवसैनिकांना मंत्रालय बघायला मिळाले आदी प्रश्नही भुसे यांनी यावेळी उपस्थित केले.
५ तारखेच्या दसरा मेळाव्याचा हा ट्रेलर आहे…
डोंबिवलीतील पाटीदार भवनमध्ये झालेल्या आजच्या या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यासाठी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली होती. त्याचा उल्लेख करत सभागृहातील ही तुडूंब गर्दी म्हणजे येत्या ५ ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याचा ट्रेलर असल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
या मेळाव्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार बालाजी किणीकर, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उप जिल्हा प्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.