केडीएमसीतर्फे आज स्स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन
कल्याण दि.२३ सप्टेंबर :
स्वच्छता ही एक सवय असून प्रत्येक नगरिकाने त्यात सहभाग घेतल्यास आपोआप एक लोकचळवळ उभी राहील आणि त्यातूनच आपले शहर स्वच्छ , सुंदर होईल असा विश्वास कल्याण डोंबिवलीचे महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केला. स्वच्छ अमृत महोत्सवाचे औचित्य साधून केडीएमसीतर्फे आज स्स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. यामध्ये कल्याणच्या विविध शाळा – महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसह केडीएमसीचे अनेक अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी सुरुवातीला स्वच्छतेची शपथही घेतली.
आज देशामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत इंदौर आणि नवी मुंबई या शहरांमध्ये पहिल्या क्रमांकाची चढाओढ दिसून येते. कारण तिथे राहणाऱ्या नागरिकांनी या स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने त्याला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आपली शहरेही सुंदर आणि स्वच्छ होण्यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेची सवय लावून घ्यावी लागेल असे आवाहनही केडीएमसी आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी केले.
दरम्यान आज सकाळी केडीएमसी मुख्यालयापासून निघालेल्या या रॅलीला आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, सचिव संजय जाधव, इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतूल पाटील, विद्युत विभागाचे उप अभियंता प्रशांत भागवत, केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रमुख विजय सरकटे, डॉ. आश्विन कक्कर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
केडीएमसीतून निघालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, लालचौकीमार्गे दुर्गाडी किल्ला आणि दुर्गाडी गणेश घाटापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी दोन्ही ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले.