बाप्पाचा प्रसाद म्हणून दिल्या जाताहेत झाडांच्या बिया
कल्याण दि.7 सप्टेंबर :
बेसुमार वृक्ष तोडीमुळे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकातच जगभरात इतर समस्यांप्रमाणे वायू प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. दर वर्षागणिक ती उग्र रूप धारण करत असून भविष्यात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन तूटवड्याचा आपल्याला सामना करावा लागेल. भविष्यातील याच भयाण वास्तवावर आधारित कल्याणच्या उत्कर्ष मित्र मंडळाने गणेशोत्सवात देखावा साकारत झाडे लावण्यासह आहेत ती झाडे जगवण्यासाठी साद घातली जात आहे.
कल्याण पश्चिमेच्या रामबाग येथील उत्कर्ष मित्र मंडळ आपल्या प्रबोधनपर देखाव्यासाठी प्रसिध्द आहे. सध्या सगळीकडेच झाडांची कत्तल, पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या रसायनांची निर्मिती आणि त्यांचा भरमसाठ वापर, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाकडे होणारी अक्षम्य डोळेझाक आदी कारणांमुळे पृथ्वीचा समतोल बिघडला आहे. परिणामी जगभरातील देशांना एकाचवेळी प्रचंड उकाडा, महापूर, वादळ आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांचे मूळ वृक्ष तोडीमध्ये असून नेमका हाच धागा पकडत उत्कर्ष मित्र मंडळाने आपल्या दृक श्राव्य देखाव्याच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.
या मंडळाने 50 वर्षांनंतर म्हणजेच 2070 मध्ये पृथ्वीवर ऑक्सिजन तुटवड्यामुळे किती भयंकर परिस्थिती उद्भवली असेल याची माहिती देखाव्यातून दिली आहे. झाडे तोडल्याने ऑक्सिजन कमतरतेमुळे निर्माण झालेली अराजकता, लोकांच्या जीवनावर झालेला विपरीत परिणाम आदींचे अत्यंत सखोल असे चित्रण या देखाव्यातून करण्यात आले आहे. तर यासोबतच हे भविष्य बदलण्यासाठी आणि भविष्यात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संदेशही देण्यात आला आहे. त्यासोबतच हा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना मोदक, पेढ्यांसोबतच झाडांच्या बियाही प्रसाद म्हणून दिल्या जात आहेत.
त्यामुळेच उत्कर्ष मित्र मंडळाने साकारलेल्या या देखाव्याचे करावे तितके कौतुक कमीच असून हा देखावा पाहण्यासाठी लोकांचीही मोठी गर्दी होत आहे.
देखाव्याची संकल्पना : रितेश रविकुमार ढोमसे
संहिता आणि आवाज : मंदार खटावकर, महेश कुलकर्णी, सुशील शिरोडकर
अनिमेशन : कविता ढोमसे, रितेश ढोमसे
लाईट : रुपेश डोंगरे
उत्कर्ष मित्र मंडळ पदाधिकारी
अध्यक्ष : सुनिल लांडबळे
उपाध्यक्ष : हर्षल वाघमारे
कार्याध्यक्ष : सोनू पटेल, विवेश कदम
खजिनदार : निलेश परदेशी
उपखजिनदार : कुमार कामत
चिटणीस : विक्की पवार