कल्याण दि.28 ऑगस्ट :
शहरांची साफ सफाई करणे हे महापालिकेचे दैनंदिन काम आहे. मात्र शहरातील स्वच्छतेसाठी अभियान राबवावे लागणे हे दुर्दैवी असल्याची खंत केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूीवर केडीएमसी प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना आयुक्त डॉ. दांगडे यांनी ही खंत व्यक्त केली.
शहरातील दैनंदिन स्वच्छता व्यवस्थित झाल्यास अशा प्रकारची मोहीम घ्यायची गरज पडणार नाही. मात्र नागरिकांनीही ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिल्यास त्याचे वर्गीकरण तसेच प्रक्रिया करण्यास सोपे जाईल असे आवाहनही आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी केले. तर शहरातील घंटागाड्यांच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार होत आहेत. मात्र ही बाब लक्षात घेत महापालिका प्रशासन लवकरच आणखी काही गाड्या खरेदी करणार आहे. जेणेकरून प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक घरापर्यंत जाऊन कचरा गोळा करणे शक्य होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
विशेष स्वच्छता अभियानांतर्गत कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात असणाऱ्या तलाव आणि आसपासच्या भागात साफ सफाई करण्यात आली. केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतूल पाटील, उपायुक्त धैर्यशील जाधव, महापालिका सचिव संजय जाधव, इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवरही या स्वच्छता अभियाना सहभागी झाले होते.