आमदार विश्वनाथ भोईर यांना पदावरुन हटविले
कल्याण दि.१६ जुलै :
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याणच्या शिवसेना शहर प्रमुखपदी ज्येष्ठ शिवसैनिक सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना शहर प्रमुखपदावरून हटवत बासरे यांची नियुक्ती केल्याचे सामनातून आज जाहीर करण्यात आले आहे.
शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेचे कल्याण पश्चिमचे विद्यमान आमदार आणि शिवसेना कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी समर्थन करत एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वनाथ भोईर यांना शिवसेना कल्याण शहरप्रमुख पदावरून हटवत त्यांच्या जागी आता ज्येष्ठ शिवसैनिक सचिन बासरे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.
सचिन बासरे हे गेल्या 32 वर्षापासून शिवसेनेत एक कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. शालेय विद्यार्थी दशेपासूनच बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. तर १९९० च्या दशकात महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने एक शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. या 32 वर्षांच्या कार्यकाळात बासरे यांनी ३ वेळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक पद, सभागृह नेतेपद त्यासोबतच स्थायी समिती सदस्यपद ही भूषवले आहे. तर सध्या ते कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्षही आहेत. अशा ज्येष्ठ शिवसैनिकाकडे कल्याण शहर प्रमुख पदाची धुरा सोपवल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.