ठाण्यातील आनंद दिघे शक्तीस्थळी भेट देत मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन
ठाणे दि.५ जुलै :
सर्वसामान्य, शोषित, वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेट दिल्यानंतर दिली. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काल ठाणे शहरात जंगी स्वागतामध्ये आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ठाण्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या आनंदनगर चेकनाका येथे जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण केली. (Govt will work to give justice to the victims including the common and deprived – CM Eknath Shinde)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदारांसमवेत रात्री सव्वा नऊच्या सुमारास आनंद नगर चेकनाक्यावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेत अभिवादन केले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, दादा भुसे, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटकही उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. कोकण विभाग परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते.
हे सरकार सर्वसामान्य, शोषित,वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल, राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.
भर पावसात घेतली नागरिकांनी भेट..
आनंद दिघे यांच्या समाधी स्थळानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथेही भेट दिली. तर आनंद आश्रमातील या भेटीनंतर भर पावसातही बाहेर उभ्या असणाऱ्या नागरिकांची मुख्यमंत्री शिंदे यांनी स्टेजवरून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनीही मुख्यमंत्री महोदयांचे जल्लोषात स्वागत केल्याचे दिसून आले.