कल्याण दि.१९ जून :
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी झालेल्या कचरावेचक मुलांचा शिवसेनेनं गौरव करत शाबासकीची थाप दिली. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सूचनेनुसार माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर आणि जयवंत भोईर यांनी या मुलांचे कौतूक करत पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेत कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडवरील मुलांनी देदीप्यमान यश मिळवले आहे. एकीकडे घरची हलाखीची परिस्थिती असतानाही या मुलांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि अनुबंध संस्थेच्या माध्यमातून हे यश मिळवले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवणाऱ्या या मुलांचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या मुलांबाबत एलएनएनने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत मुलांचे कौतूक करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानूसार आज सकाळी श्री कॉम्प्लेक्स येथील जनसंपर्क कार्यालयात प्रभूनाथ भोईर आणि जयवंत भोईर यांनी या मुलांचा यथोचित सत्कार केला. तसेच या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीदेखील प्रभूनाथ भोईर यांनी दिली. त्याचसोबत प्रभूनाथ भोईर यांनी या मुलांसोबत आपला वाढदिवसही साजरा केलेला पाहायला मिळाला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीमुळे आमदार विश्वनाथ भोईर या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनीही या मुलांचे अभिनंदन करत त्यांच्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी अनुबंध संस्थेचे विशाल जाधव, सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, वैभव देशमुख आणि बाळा शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.