अवघ्या काही मिनिटांच्या पावसात आज पुन्हा साचले पाणी
कल्याण दि.16 जून :
कल्याण पश्चिमेच्या शहाड परिसरात आज पुन्हा एकदा पाणी साचल्याविरोधात संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. जवळपास 15 – 20 मिनिटे या नागरिकांनी शहाडच्या मुख्य मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. दरम्यान यावेळी केडीएमसी आयुक्तांची गाडी समजून नागरिकांनी कल्याणच्या डीसीपींची गाडी अडवून धरली.
कल्याण डोंबिवलीत अद्याप पावसाला नीटशी सुरुवातही झालेली नाहीये. मात्र त्यानंतरही कल्याण पश्चिमेच्या शहाड परिसर काही मिनिटांच्या पावसात जलमय होतोय. गेल्या आठवड्यात याठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाणी साचले होते. तर आजही संध्याकाळच्या सुमारास काही मिनिट पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा शहाड पुल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. तसेच यावेळी केडीएमसी आयुक्तांची गाडी समजून कल्याणच्या डीसींपींची गाडी रोखून धरली होती.
दरम्यान काही वेळातच पोलिसांची कुमक याठिकाणी दाखल झाली आणि नागरिकांना बाजूला करत रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र त्यानंतरही केडीएमसी विरोधात नागरिकांचा रोष चांगलाच जाणवत होता. अद्याप पाऊस व्यवस्थित सुरूही झाला नाही तर अशी अवस्था आहे. मग नीट पाऊस सुरू झाल्यानंतर आमची काय अवस्था होईल अशी चिंता नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.