कल्याण – डोंबिवली दि. 5 मे :
‘आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज सायंकाळी अमूक-तमूक वाजता आपला वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्याकरता सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर ताबडतोब संपर्क साधावा’ अशा आशयाचा मेसेज तुम्हाला मोबाईलवर आला असेल तर जरा थांबा. त्यावर कॉल करण्याची कोणतीही घाई करू नका किंवा घाबरून तर अजिबात जाऊ नका. कारण महावितरणकडून अशाप्रकारे कोणतेही मेसेज किंवा व्हॉटस् अप मेसेज पाठवले जात नसून या खासगी क्रमांकावरून आलेल्या मेसेजना प्रतिसाद किंवा उत्तर न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा आहे महावितरणच्या मेसेजचा आयडी…
वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या परंतु महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा व्हॉट्स अॅप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच महावितरणकडून सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नसल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणकडून पाठवले जातात हे मेसेज…
महावितरणकडून केवळ ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल आणि दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख किंवा वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
आर्थिक फसगत होऊ शकते…
वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट असून त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते. त्यामुळे वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये.
काही शंका किंवा तक्रार असल्यास इकडे संपर्क करा…
काही शंका किंवा तक्रारी असल्यास वीज ग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.