Home ठळक बातम्या भाजपकडून नवहिंदू ओवेसींना महाराष्ट्रात शिवसेनेविरोधात लढवण्याचे काम – खासदार संजय राऊत यांची...

भाजपकडून नवहिंदू ओवेसींना महाराष्ट्रात शिवसेनेविरोधात लढवण्याचे काम – खासदार संजय राऊत यांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टिका

 

भाजपचे सुडाचे राजकारण देशाला , महाराष्ट्राला परवडणारे नाही

डोंबिवली दि.30 एप्रिल :
ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने एका ओवसीला उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी वापरण्यात आले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही नव हिंदू ओवेसीला शिवसेनेविरोधात लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करीत असल्याची जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. डोंबिवलीत भाऊ चौधरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मिसळ महोत्सवात ते प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर लोकांना बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदयसम्राट म्हणून लोकांना माहिती आहेत. कोणी कितीही शाली पांघरल्या, नकला केल्या तरी शेवटी हिंदू हृदयसम्राट हे एकच असल्याचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर सध्या महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की ज्याप्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे ती मात्र आपली संस्कृती नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही सत्ताधारी आणि विरोधक, विविध विचारांचे लोकं एकमेकांच्या भूमिकांना विरोध करत राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर किंवा पवारांनी बाळासाहेबांवर वेळोवेळी टिका केली.

परंतु महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुड, द्वेष आणि कमरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच झाले नाही.भाजपने गेल्या 2 – 4 वर्षांत सुरू केलेले राजकरण महाराष्ट्र आणि देशाला परवडणारे नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर मिसळ ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असून त्यात झटका आहे. उद्या महाराष्ट्र दिन असून स्वाभिमानाचा झटका अनेकांना द्यावा लागणार असल्याचा अप्रत्यक्ष इशाराही खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिला.

यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हायुवा अधिकारी, दिपेश म्हात्रे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमूख भाऊ चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, संजय राऊत यांचे जावई मल्हार राजेश नार्वेकर, अभिषेक चौधरी, अर्जुन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान यावेळी खासदार संजय राऊत यांनी मिसळ महोत्सवातील विविध मिसळ स्टॉलला भेट देत वेगवेगळ्या मिसळीची चव चाखली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा