भाऊ चौधरी फाऊंडेशन आणि शिवसेना – युवासेनेतर्फे आयोजन
डोंबिवली दि. ३० एप्रिल :
भाऊ चौधरी फाऊंडेशनतर्फे कालपासून डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या मिसळ महोत्सवाला पहिल्याच दिवशी खवय्यांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले. या मिसळ महोत्सवाच्या माध्यमातून एकाच छताखाली महाराष्ट्रातील अनेक प्रसिध्द, चमचमीत आणि चविष्ट मिसळ चाखण्याची संधी प्राप्त झाली असल्याची माहिती आयोजक भाऊ चौधरी यांनी दिली.
मिलापनगर येथील दत्तात्रय गाडेकर या 93 वर्षांच्या तरुण आजोबांच्या हस्ते मिसळ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळ नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, अभिषेक चौधरी,राज परब, ललित शाईवाले,संतोष कोरडे, अरविंद बिरमोळे, रवी पाटील, अमोल पाटील,प्रकाश टेलगोटे,अशोक पगारे,आदी मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवली पूर्वेच्या वै. ह.भ. प. सावळाराम महाराज क्रिडा संकुलात 1 मे पर्यंत (संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत) हा मिसळ महोत्सव होत आहे. ज्यामध्ये खवय्यांना कोल्हापूर, सांगली, कणकवली, जुन्नर, कल्याण, पारनेर, देहू आदी भागातील चविष्ट मिसळची चाखता येईल. त्यासोबतच डोंबिवलीकरांना यामध्ये प्रथमच येवल्याची पैठणी लकी ड्रॉ द्वारे जिंकण्याची संधी असून विविध हस्तनिर्मित कलावस्तू खरेदी करता येणार आहेत. दरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊत हे या महोत्सवाला भेट देणार आहेत.