Home ठळक बातम्या वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अनुबंधचे काम कौतुकास्पद – अतिरिक्त आयुक्त सुनिल...

वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अनुबंधचे काम कौतुकास्पद – अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार

 

प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणामध्ये यश मिळवणाऱ्या मुलांचा सत्कार

कल्याण दि.२८ एप्रिल :
कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अनुबंध संस्थेचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी काढले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनुबंध संस्थेतर्फे शैक्षणिक स्तरावर पुढे जाणाऱ्या वंचित मुलांच्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते.

तर आपण कोणत्याही मोठ्या कुटुंबातून नव्हे तर तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातून, मराठी शाळेतून शिकून पुढे आलेलो आहोत. त्यामुळे वंचित समाज, तळागाळातील लोकांचे प्रश्न माहिती असून ते सोडवण्यासाठी आनंदच मिळतो. महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही काम करत असून महापालिकेतर्फे शिक्षणासाठी खूप चांगले उपक्रम सुरू केल्याचेही अतिरिक्त आयुक्त पवार यांनी सांगितले. तर काहीही करून डंपिंग ग्राउंड हटवण्याचा आमचा निर्धार असून कचऱ्याचे दृष्टचक्र मोडून काढले पाहिजे. आणि त्यावर काम करणाऱ्या लोकांच्या आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेतर्फे घन कचरा हा धन कचरा होण्याच्या दृ्टीने प्रयत्न सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान यावेळी डंपिंग ग्राऊंडवर कचरा वेचण्याचे काम करता करता शिक्षणाचे मोती वेचणाऱ्या मुलांचा विशेष गौरव करण्यात आला. कचरा वेचणाऱ्या मुलांमधील पहिला पदवीधर आणि सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा रवी घुले असो की पदवीधर होण्याच्या दिशेने अत्यंत चांगल्या प्रकारे वाटचाल करणारी प्रिती ढगे असो. अशा प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता यशस्वीपणे शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहाकडे आगेकूच करणाऱ्या अनेक मुलांच्या पाठीवर यावेळी मान्यवरांच्या हस्ते कौतुकाची थाप देण्यात आली.

यावेळी प्रा. उदय सामंत, केडीएमसी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी जे.जे. तडवी, विजय सरकटे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, केंब्रीआ शाळेच्या मीनल पोटे, विजय पंडीत, आचीवर्स कॉलेजचे महेश भिवंडीकर, सीए असोसिएशन कल्याण विभागाचे अध्यक्ष कौशिक गडा, राष्ट्र सेवा दलाचे सुहास कोते आणि अनुबंध संस्थेचे मीनल सोहनी, विशाल जाधव, विशाल कुंटे, सूर्यकांत कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा