अधिकाऱ्यांच्या दालनातील लाईट, पंखे, एसी केले बंद
कल्याण दि.२३ एप्रिल :
आधीच असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा अक्षरशः आगीमध्ये तेल टाकण्याचे काम करत आहे. परिणामी नागरिकांच्या संयमाचा कडेलोट होऊ लागला आहे. आज सकाळी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण भागातील संतप्त नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागात तब्बल ६-६ तास वीज पुरवठा खंडित होत आहे. कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागात लाईट नसल्याने पाण्याचेही हाल होत आहेत. आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची अवस्था म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. त्यामूळे अखेर आज कल्याणातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर शिवसेना आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी भर दुपारी धडक दिली. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, सेना पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिक, महिला आणि लहान मुले या मोर्चात सहभागी झाले होते.
दरम्यान यावेळी शिवसेना आणि संतप्त नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनातील लाईट, पंखे आणि एसी यंत्रणा बंद करून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ग्रामीण भागातील हे अघोषित भार नियमन बंद करण्याची मागणीही शिवसेनेकडून यावेळी करण्यात आली.