डोंबिवली दि. 22 एप्रिल :
आधीच दिवसा होणाऱ्या असह्य उकाड्यामुळे नकोसे झालेले असताना पहाटेच्या सुमारास तब्बल 3 तास बत्ती गुल झाल्याने डोंबिवलीकर हैराण झाले. महापारेषणच्या पाल ते पलावा या अति उच्चदाब उपकेंद्राला जोडणारी वीजवाहिनी तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. मात्र नेमक कशामुळे वीज पुरवठा खंडित झालाय याची माहिती मिळवण्यासाठी महावितरण कार्यालया आणि अधिकाऱ्यांकडून डोंबिवलीकरांना कोणतीच माहिती न मिळाल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले होते.
गेल्या 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत सुरू अक्षरशः आग ओकत आहे. त्यामुळे तापमानाचा पारा थेट 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा बाहेर पडणे मोठे जिकिरीचे काम झाले आहे. अशातच डोंबिवलीच्या काही भागातील वीज पुरवठा आज पहाटे साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास खंडित झाला. बराच वेळ उलटूनही वीज न आल्याने नागरिकांनी महावितरण कार्यालय आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती डोंबिवलीकरांनी दिली. परिणामी असह्य विजेविनाच डोंबिवलीकरांच्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली. आणि डोंबिवलीकरांचे नेहमीचे सर्व रूटीन कोलमडून पडले. बत्ती गुल झाल्याचा सर्वाधिक फटका विशेषतः लहान मुले, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना बसल्याचे दिसून आले.
दरम्यान महापारेषणच्या पाल ते पलावा या अतिउच्चदाब उपकेंद्राला जोडणारी वीजवाहिनी तुटल्याने महावितरणच्या डोंबिवली आणि कल्याण पूर्व भागातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणकडून सकाळी देण्यात आली.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करत सकाळी साडेसात वाजेपर्यंत बाधित सर्व भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.