कल्याण दि.१६ एप्रिल :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आज हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून कल्याणात मनसैनिकांकडून महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात झालेल्या सभेमध्ये त्यांनी येत्या ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचे अल्टीमेटम दिले. तसेच हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन केले होते.
त्याला अनुसरून कल्याणात मनसेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदीरात महा आरती आणि हनुमानचालीसा पठण करण्यात आले. यावेळी जय श्रीराम, जय हनुमानच्या जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
तर राज्य सरकारने ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरल्यास आम्ही मशिदीबाहेर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करू , सरकारने विसरू नये की टायगर अभी जिंदा है अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी व्यक्त केली.
यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यासह मनसेचे महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.