Home ठळक बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक समाजातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल – पालकमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक समाजातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल – पालकमंत्री एकनाथ शिंदे

 

कल्याण पूर्वेतील भव्य स्मारकाचे दिमाखदार सोहळ्यात भूमीपूजन

कल्याण दि.13 एप्रिल :
कल्याण पूर्वेत साकारणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे समाजातील प्रत्येक नागरिकासाठी सदैव प्रेरणादायी ठरेल असा विश्वास नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कल्याण पूर्वेत केडीएमसीतर्फे साकारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे दिमाखदार सोहळ्यात भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केला.

कल्याण पूर्वेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रदीर्घकाळ काळापासून केली जात होती. मात्र अनेक तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींवर मात करत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे विक्रमी वेळेत हे स्मारक आता प्रत्यक्षात उतरणार आहे. ज्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेची दखल संपूर्ण जगाने घेतली अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे स्मारकही तसेच भव्य दिव्य होतेय. मात्र त्याच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे आवाहनही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रस्ताव सादर करा त्यासाठीही आपण निधी उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले.

खासदार श्रीकांत शिंदे चांगले काम करत आहेत…
लोकसभेला उमेदवारी मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र अशी ओळख होती. परंतु त्या 5 वर्षांत त्याने कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली असे सांगत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भुमीपूजन कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. एकदा हातत घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करणे सोडत नसल्याचे गौरवोद्गारही एकनाथ शिंदे यांनी काढले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच भारतामध्ये स्थिर राजवट – केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील…
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर पार्लमेंटमध्ये १२५ तास चर्चा घडविली होती. तर भाजपाच्यावतीने देशभरात मंडल स्तरावर संविधान वाचन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच भारतामध्ये स्थिर राजवटी राहिली आहे. तर पाकिस्तानमध्ये एकही पंतप्रधान 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही, यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्त्व असल्याचे मत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले.

 

लाखो कल्याणकरांच्या अनेक वर्षांपासूनच्या स्वप्न पूर्तीला प्रारंभ – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण पूर्वेतील नागरिकांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले महामानव भारतरत्न प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकारत असल्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. या स्मारक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकांचे भव्य ग्रंथालय, छायाचित्रांचे दालन आणि बहुउद्देशीय भव्य सभागृह उभारले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार आणि महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य या स्मारकाच्या माध्यमातून होणार असल्याची भावनाही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.

खेळीमेळीचे वातावरण, कोपरखळ्या, थट्टा – मस्करी आणि शाब्दिक चिमटे…
एकीकडे सध्या भाजप आणि शिवसेनेमधील संबंध चांगलेच ताणलेले गेलेले दिसत आहेत. अगदी छोट्यात छोट्यात कारणावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीयेत. मात्र कल्याण पुर्वेत झालेला कालचा कार्यक्रम या सर्वाला अपवाद ठरला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हरवलेल्या महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीयतेचे, सर्वसमावेशक राजकारणाचे सकारात्मक चित्र दिसून आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपचे आमदार गणपत गायकवाड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपापल्या भाषणातून एकमेकांना कोपरखळ्या, थट्टा – मस्करी आणि चिमटे काढलेले पाहायला मिळाले. ज्यामुळे राजकरणात सध्या एकेमकांमध्ये निर्माण झालेली कटुता काही काळ विसरून सर्व जण एकरूप झालेले पाहायला मिळाले.

 

या भूमिपुजन सोहळ्याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी, उप-जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, दलित मित्र अण्णा रोकडे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीचे अध्यक्ष प्रशांत बनसोडे, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, माजी नगरसेवक निलेश शिंदे, आरपीआय कार्याध्यक्ष भारत सोनवणे, समिती अध्यक्ष शेखर केदारे, हर्षवर्धन पालांडे, विशाल पावशे, युवासेना विस्तारक राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा