कल्याण दि. 10 एप्रिल :
सतत 2 वर्षे विविध पत्रव्यवहार, निदर्शने, आंदोलने केल्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बैठक घेत सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना 21 मार्च रोजी दिले होते. त्यामुळे राज्यातील हजारो वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऊर्जामंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले असल्याची माहिती कंत्राटी कामावर संघटनेचे कल्याण परिमंडळ अध्यक्ष मनोज मनुचारी यांनी दिली आहे.
वीज उद्योगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असून कुंपणच शेत खात असल्याचा आरोप मनोज मनुचारी यांनी केला आहे. तर कामगारांच्या तक्रारींची दखल प्रशासन घेत नसल्याने कामगारांमध्येहि प्रचंड असंतोष आहे. वीज कंपनीतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार थांबवून या कामगारांना कंत्राटदारमुक्त आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत रोजगाराची हमी इत्यादी दिलासा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ 2015 पासून करत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे या प्रयत्नाना नक्कीच यश मिळेल असा विश्वासही संघटनेला असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान एसटी महामंडळाच्या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण ही घटना दुर्दैवी असली तरी केवळ दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्यामुळेच या शोषित पीडित कामगारांच्या संयमाचा बांध फुटला हे सत्य असल्याचेही मनूचारी यांनी प्रसिद्धी माध्यमांना पाठवलेल्या पत्रकात नमूद केले आहे. त्यामूळे
कंत्राटदारांच्या जाचातून या कामगारांना मुक्त करून कंपनीचा आर्थिक फायदा करावा असे साकडेही संघटनेने ऊर्जामंत्र्याना घातले आहे. त्यावर आता ऊर्जामंत्र्यांच्या या निर्णयाकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.