डोंबिवली दि.३ एप्रिल :
देशभरात वाढलेल्या महागाईमुळे जनता त्रस्त झाल्याचे सांगत डोंबिवलीत युवासेनेतर्फे केंद्र सरकारविरोधात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. डोंबिवली पूर्वेच्या इंदिरा गांधी चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार महागाई सरकार, देश संभाले संता बंता बेहाल झाली सारी जनता अशा आशयाची युवासेनेकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारचां निषेध म्हणून युवासेनेच्या आंदोलकांनी जोरदार थाळीनाद केलेला पाहायला मिळाला. तर प्रतीकात्मक निषेध म्हणून स्वयंपाकाच्या रिकामा सिलेंडर आणून त्यालाही जोरदार बडवत घोषणा देण्यात आल्या.
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशात सत्तेमध्ये आलेल्या मोदी सरकारला जनतेचा विसर पडला आहे. त्यांना आता केवळ दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सत्तेचे लक्ष्य दिसत आहे. मात्र महागाईमूळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत बेहाल झालेली जनता त्यांना अजिबात दिसत नसल्याची टिका यावेळी युवसेना जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे यांनी केली. यावेळी झालेल्या आंदोलनात शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह युवासेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.