कल्याण दि.22 मार्च :
केडीएमटीच्या बसला लागलेल्या भीषण आगीमध्ये बसचा अक्षरशः कोळसा झाल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
कल्याणहून मलंगगडला जाणारी ही बस होती. नेवाळी गाव आणि नेवाळी पाडादरम्यान ही बस आली असताना बसला अचानक आग लागली. बस चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने बसमध्ये असणाऱ्या 5 ते 6 प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले. आणि त्यानंतर बस चालक आणि वाहक बसबाहेर पडले.
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नसून आगीमध्ये बसचा मात्र पार कोळसा झाला. केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत आगीमध्ये बस जळून भस्मसात झाली होती अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.