कल्याण पूर्वेतील कल्याण महोत्सवाचे शानदार उद्घाटन
कल्याण दि.12 मार्च :
गेली 2 वर्षे आपण कोवीडशी झुंजतोय, लढलोय. आता कोवीड पेशंट कमी होत असताना लोकांना कल्याण महोत्सवासारख्या सांस्कृतिक आणि विरंगुळ्याच्या कार्यक्रमाची गरज असल्याचे मत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि दिलीप दाखिनकर यांच्या आई गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पूर्वेमध्ये दिमाखदार अशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कल्याण महोत्सवाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
गेली 2 वर्षे आपण सर्वांनी कोवीडशी लढा दिला आहे. एकीकडे कोवीड आणि दुसरीकडे वर्क फ्रॉम होममूळे लोकांनी अत्यंत मानसिक तणावाखाली हे दिवस काढले आहेत. त्यामूळे आजच्या काळात लोकांना कल्याण महोत्सवासारख्या विरंगुळ्याच्या आणि करमणुकीच्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. तसेच लोकांनीही अशा चांगल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तर कोवीड काळात रक्ताची नाती दुरावली असताना केवळ शिवसेनाच आणि शिवसैनिकच होते जे आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीसाठी धावून गेले असल्याचे गौरवोद्गारही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी काढले. तसेच कोवीड काळात महेश गायकवाड यांनी केलेल्या मदतकार्याचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
पुढील 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक निलेश शिंदे, दया गायकवाड, मनोज चौधरी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.