डोंबिवलीतील रॅलीत राम मंदिराची प्रतिकृती
कल्याण – डोंबिवली दि.10 मार्च :
मिनी लोकसभा म्हणून पाहिले गेलेल्या देशातील उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यामध्ये 4 राज्यात विजयी घोडदौड करणाऱ्या भाजपने सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवलीतही भाजपतर्फे या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन झालेले पाहायला मिळाले. डोंबिवलीत निघालेल्या विजयाच्या रॅलीमध्ये राम मंदिराची प्रतिकृती असणारा रथ सहभागी करण्यात आला होता. (Strong celebration by BJP in Kalyan Dombivali for election victory)
देशाचा राजमार्ग अशी ओळख असणाऱ्या उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) गोवा (Goa), पंजाब (Punjab) उत्तराखंड (Uttarakhand) आणि मणीपुरमध्ये (Manipur) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यामध्ये पंजाब वगळता भाजपने अत्यंत दमदार अशी कामगिरी केल्याचे निकलांवरून दिसून येत आहे. भाजपने मिळवलेल्या या यशानंतर देशभरासह राज्यभरात उत्साहाचे वातावरण असून भाजप कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत.
डोंबिवलीमध्येही भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी घरडा सर्कल ते गणपती मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. तर या रॅलीचे सर्वात मोठे आकर्षण ठरला तो ‘राम मंदिराची प्रतिकृती असलेला रथ. अयोध्येमध्ये श्रीरामाचे भव्य मंदिर बनवण्याचे काम सुरू असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं प्रत्येक डोंबिवलीकराला वाटत असल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच योगीजी पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने आता राम मंदिराचे काम अधिक लवकर पूर्ण होईल याची खात्री असल्याने आम्ही हा जल्लोष करत आहोत. या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशातील सर्व नागरिक नरेंद्र मोदीं यांच्यासोबत असल्याचे सिद्ध झाल्याची प्रतिक्रियाही रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
कल्याणातही जोरदार सेलिब्रेशन…
चार राज्यातील निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाचे कल्याणातही जोरदार सेलिब्रेशन झालेले पाहायला मिळाले. कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी जंगी आनंदोत्सव साजरा केला. ढोल ताशावर बेभान होऊन नाचणारे कार्यकर्ते आणि विजयाची जोरदार घोषणाबाजी असे काहीसे चित्र यावेळी पाहायला मिळाले. या निवडणूक निकलांवरून आजही देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचेच स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली.