Home ठळक बातम्या केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी शिवसेना नेत्यांवर टिका – वरूण सरदेसाई यांचा भाजपवर...

केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी शिवसेना नेत्यांवर टिका – वरूण सरदेसाई यांचा भाजपवर निशाणा

 

कल्याणात आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला दिली भेट

कल्याण दि.26 फेब्रुवारी :
आपल्यालाही प्रकाशझोतात राहायला पाहीजे, आपल्या बातम्याही मिडियामध्ये कव्हर झाल्या पाहीजेत यासाठी शिवसेना नेत्यांवर, टिका करायची, शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर टिका करायची ही काही लोकांची वृत्ती झाली आहे. टिका केल्याशिवाय त्यांच्या बातम्या केल्या जात नाहीत म्हणून हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे सांगत युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी भाजपवर नाव न घेता निशाणा साधला.

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल जिल्हा फूटबॉल संघटना आणि युवासेना सहसचिव योगेश निमसे यांच्या माध्यमातून कल्याणात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या फुटबॉल स्पर्धेला युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी भेट दिली.

राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आणि एकनाथ शिंदे पालकमंत्री झाल्यावर कल्याण डोंबिवली परिसरात विकासाची गंगा वाहायला लागली आहे. त्याचाच एक रिझल्ट म्हणून विविध पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कल्याण डोंबिवलीतील कुठल्याही नागरिकाला विचारले नंतर त्यांच्या मनामध्ये एकच पक्ष आहे, तो शिवसेना. आणि मग कुठे तरी आपल्यालाही प्रकाश झोतात राहायला पाहिजे, मिडियामध्ये आपल्याही बातम्या कव्हर केल्या पाहीजेत, म्हणून ओढून ताणून शिवसेना नेत्यांवर टिका करायची, शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर टिका करायची ही काही लोकांची वृत्ती झालेली आहे. शिवसेना नेत्यांवर टिका केल्याशिवाय त्यांच्या बातम्या केल्या जात नाहीत म्हणून हा केविलवाणा प्रयत्न आहे असल्याचे सांगत वरूण सरदेसाई यांनी नाव न घेता भाजपला फटकारले.

तर केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात युवासेनेचे पदाधिकारी अतिशय उत्तमपणे काम करत आहेत. राज्यातील युववर्गासाठी काम करत असताना अनेक युवासेना पदाधिकारी निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून इच्छूकही आहेत. मात्र कोणाला तिकीट द्यायचे, कोणाला संधी द्यायची हा सर्वस्वी निर्णय शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा आहे. एखादा पदाधिकारी चांगले काम करत असेल तर त्याच्यामागे शिवसेनेचे नेते नक्की उभे राहतील असा विश्वासही सरदेसाई यांनी आगामी केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केला.

यावेळी युवासेना सहसचिव योगेश निमसे, केडीएमसीच्या स्थायी समितीचे माजी सभापती दिपेश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून 32 फुटबॉल संघ सहभागी झाल्याची माहिती आयोजक योगेश निमसे यांनी दिली. ज्यामध्ये मुंबई संघाचा सदस्य आणि राष्ट्रीय खेळाडू स्टीव्हन डाईसचाही समावेश आहे. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर वैजयंती गुजर – घोलप यांच्या प्रमूख उपस्थितीत या स्पर्धेला प्रारंभ झाला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा