Home ठळक बातम्या अंतराळातील घडामोडींच्या अफवांचा वेगळाच बाजार सुरू – खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण...

अंतराळातील घडामोडींच्या अफवांचा वेगळाच बाजार सुरू – खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचे परखड मत

 

सुखी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज केली व्यक्त

डोंबिवली दि.21 फेब्रुवारी :
जगभरातून काही जण भीतीदायक अफवा पसरवीत आहेत. लघुग्रह आदळून पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होणार, लवकरच जगबुडी होणार, चंद्रावरचे प्लॅाटस् खरेदी करता येतील, जन्मराशीप्रमाणे आकाशातील तारकांना तुमचे नाव दिले जाते अशा अनेक अफवा पसरविल्या जात असून वेगळाच व्यवसाय सुरु झाल्याचे परखड मत ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी डोंबिवलीत व्यक्त केले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवली शिवसेना शहर शाखा आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेकडील के.बी. विरा शाळेच्या पटांगणावरील ग्रंथोत्सवात सोमण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

वयाची ८० वर्षे पूर्ण केली तसेच पंचांग आणि खगोल अभ्यासाची पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना डोंबिवली शहर शाखा, शेतीजन्य आणि साहित्ययात्रा यांच्या तर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल, महावस्त्र, पुस्तक आणि श्रीफळ देऊन दा. कृ. सोमण यांचा सन्मान करण्यात आला. अमेय रानडे यांनी सूत्रसंचालन केले.

आपण काही काळापुरते पृथीवर आलेले पाहुणे आहोत…

आश्चर्य वाटेल असेल अशा घटना असंख्य आहेत. हे विश्व १३.७ अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटातून निर्माण झाले आहे. हे विश्व विस्तारत आहे. महास्फोटानंतर अवकाश-स्पेस, काल-टाइम आणि वस्तू- मॅटर निर्माण झाले. या विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत. यामध्ये आपली आकाशगंगा आहे आणि या आकाशगंगेत आपली सूर्यमाला असून त्यात आपली पृथ्वी आहे. या विश्वात आपले जीवन नगण्य आहे. आपण काही काळापुरते पृथीवर आलेले पाहुणे आहोत. आपण त्याचे मालक नाही असे दा. कृ. सोमण म्हणाले.

सूर्य अजून अब्ज वर्षे राहणार…

सूर्य 5 अब्ज वर्षांपूर्वी जन्मला असून अजून पाच अब्ज वर्षे राहणार आहे. आपला सूर्य आकाशगंगेच्या मध्यापासून २७ हजार २०० प्रकाशवर्ष अंतरावर राहून दर सेकंदास २२० किमी. या वेगाने आकाशगंगेच्या मध्याभोवती प्रदक्षिणा करतो. २५ कोटी वर्षात त्याची एक प्रदक्षिणा होते. आत्तापर्यंत सूर्याने २० प्रदक्षिणा पूर्ण केल्याचे सोमण यांनी सांगितले.

चंद्रावर अमावास्या असते आणि पृथ्वीवर अमावास्या ती चंद्रावर पौर्णिमा…

चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किमी. अंतरावर आहे. चंद्र पृ्थ्वीवर आदळणार नाही. उलट पृथ्वीवरील सागराला येणा-या भरती-ओहोटीमुळे चंद्र दरवर्षी ३.८ से. मीटरने दूर जात आहे. चंद्रावरून आकाश काळे दिसते. सूर्य, पृथ्वी, ग्रह-तारका दिसतात. पृथ्वी चंद्राच्या चौपट आकाराची दिसते. चंद्राची सफर दा. कृ. सोमण यांनी यावेळी उदाहरणे देऊन घडविली. पृथ्वीवर पौर्णिमा असते त्यावेळी चंद्रावर अमावास्या असते आणि पृथ्वीवर अमावास्या ती चंद्रावर पौर्णिमा. ज्याचे पृथ्वीवर ६० किलो वजन त्याचे चंद्रावर १० किलो वजन होईल. चंद्रावरून सूर्यग्रहण आणि पृथ्वीग्रहणे कशी दिसतील तेही सोमण यांनी समजावून सांगीतले.

आपले जीवन आकाशातील ग्रहांवर नाही तर…

१७ नोव्हेंबर २००० रोजी ताशी चारशे उल्का पडतांना पहायला मिळाल्या. तसा लिओनिड मोठा उल्कावर्षाव दर ३३ वर्षांनी दिसतो असे सांगत उल्का आणि अशनी यातील फरकही त्यांनी उपस्थितांना समजावून दिला. भविष्यात अवकाश सहल शक्य होईल. शून्य गुरुत्वाकर्षणात राहणे, अवकाशातून पृथ्वीदर्शन घेणे, अंतराळ स्थानकात राहणे आणि हनिमूनसाठी प्रत्यक्ष चंद्रावर जाणे सहज शक्य होईल असे त्यांनी सांगितले. आपले जीवन आकाशातील ग्रहांवर नाही तर माणसाच्या मनातील आग्रह, विग्रह, अनुग्रह, संग्रह, पूर्वग्रह इत्यादी ग्रहांवरच अवलंबून असते.

डॉ. राणी दुष्यंत खेडीकर यांनी लिहिलेल्या आणि ग्रंथालीने प्रकशित केलेल्या “लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण” या पुस्तकाचे दा. कृ. सोमण यांचे हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. ग्रंथालीचे प्रभाकर भिडे, डॉ. राणी दुष्यन्त खेडीकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी विद्या निकेतन शाळेचे विवेक पंडित, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा