डोंबिवलीतील मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचे मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र
डोंबिवली दि.21 फेब्रुवारी :
एक कोणी तरी गेलं म्हणून मनसे संपली असं होतं नाही, आम्हाला एकसंध राहायची सवयही आहे आणि माहितीही आहे. त्यामुळे कोणी या भ्रमातही राहू नये, हा चालला, तो चालला अशी अफवा पसरवली जात आहे. कोणीही जात नाहीये आणि जाणार पण नाही. आणि गेलंच तर मी बघून घेईन अशा शब्दांत मनसे आमदार राजू पाटील यांनी पदाधिकारी – कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला.
मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
या कार्यकर्ता मेळाव्यात 300 जणांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्याचाच धागा पकडून बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले की लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत एक भव्य प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि त्यातून दाखवून देऊ की मनसे इकडे काय आहे. कोणीही भ्रमात राहू नये. फक्त अफवा पसरवली जात आहे की हा चालला, तो चालला. कोणी जात नाही, कोणी जाणार नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
तर कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद आहे. 2009 साली 28 नगरसेवक निवडडून आले होते. मोदी लाटेच्या वेळी 10 नगरसेवक निवडून आल्याची आठवण करून देत आगामी काळात अनेक जण मनसेत येणार आहेत. आज झालेला पक्ष प्रवेश हा केवळ झाकी असून अद्याप निवडणूक बाकी असल्याचे वक्तव्यही आमदार राजू पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह हर्षद पाटील, मंदा पाटील, राहुल कामत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.