शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांची संकल्पना
कल्याण दि.18 फेब्रुवारी :
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे महाराजांना अनोख्या प्रकारे मानवंदना देण्यात आली आहे. थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 6 हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांची ही छबी साकारण्यात आली आहे.
गेल्या ३६ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून यंदा शिवरायांना वंदन करण्यासाठी 6 हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून तिसगांवातील तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात ही शिवप्रतिमा साकारण्यात आली आहे.
शिवप्रतीमेची ही कलाकृती प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी रुपेश गायकवाड हे स्वःता गेले महिनाभर आपल्या प्रायोगिक पद्धतीने सराव करीत होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून ही कलाकृती आपण तिसाई देवीच्या चरणी समर्पीत केल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही शिव जयंती उत्सवावर कोवीडचे संकट कायम असल्याने या वर्षीही १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंती दिनी तिसाई देवीच्या प्रांगणात शिव जयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिव प्रतिमेचे पुजन होणार असून त्यानंतर विविध संस्था संघटनांना वृक्ष रोपांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. तर शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी शिवप्रतिमेत वापरण्यात आलेल्या वृक्षरोपांचेही विविध संस्था संघटनांना वाटप करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजु अंकूश आणि विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले .