वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत कामाचीही स्तुती केल्याने आश्चर्य
कल्याण दि. 3 फेब्रुवारी :
केडीएमसी निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवरून एकीकडे भाजपने शिवसेनेवर हल्ला चढवला असताना कल्याणच्या प्रमूख चौकात लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासह त्यांची आणि त्यांच्या कामांची स्तुती करणारा बॅनर भाजप नगरसेवक दया गायकवाड यांच्याकडून लावण्यात आला आहे. त्यामूळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
केडीएमसीची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे साहजिकच सर्वच प्रमूख राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यातच 1 फेब्रुवारी रोजी केडीएमसी निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. आणि एकच राजकीय धुरळा उडाला. ही प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची असल्याचा आरोप करत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेला चांगलेच लक्ष्य केले आहे. तर शिवसेनेला कोंडीत पकडण्याची कोणतीही संधी सोडताना भाजप सध्या दिसत नाहीये.
अशातच कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमूळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे भाजप शिवसेनेवर टिका करण्याची एकही संधी सोडत नसताना दुसरीकडे भाजपच्याच नगरसेवकाकडून शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देणारा बॅनर लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या बॅनरमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देण्यासह त्यांची आणि त्यांच्या कामाची स्तुतीही करण्यात आली आहे.
दरम्यान काही आठवड्यांपूर्वी भाजपातील काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामध्ये भाजपच्या आणखी काही नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. ज्यामध्ये दया गायकवाड यांचेही नाव होते. त्या पार्श्वभूमीवर आज कल्याणात लावण्यात आलेल्या या बॅनरवरून गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे भविष्यातील आपल्या बदलांची दिशा दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे.