कल्याणात जनजागरण यात्रा काढून केला केंद्र सरकारचा निषेध
कल्याण दि.21 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महत्वाची महापालिका असून काँग्रेस पक्ष इकडे सत्तेमध्ये नाही. मात्र आगामी केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता मिळाल्यानंतर महापालिकेतील भ्रष्टाचारी व्यवस्था संपवणार असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या विरोधात कल्याणात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जनजगारण पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
कल्याण डोंबिवली हे सर्वात चांगले शहर बनवणे, लोकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे, इथला केडीएमसीतील भ्रष्टाचार संपवणे आदी गोष्टी काँग्रेस केडीएमसीमध्ये निवडून आल्यावर करेल असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.
…म्हणून केंद्र सरकारने मागे घेतले कृषी कायदे
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या एक वर्षापासून शेतकरी देशाच्या सीमेवर उपोषणाला बसले होते. मात्र त्यांच्याशी बोलायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नव्हता आणि अचानक सकाळी एकाएकी जागे होत काळे कायदे मागे घेतले. मात्र त्यासाठी ते सांगत असणारे कारण आणि उभे करत असणारे चित्र वेगळे असल्याची टिका नाना पटोले यांनी यावेळी केली.
येत्या काळात उत्तरप्रदेश, पंजाबसह काही राज्यात निवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकीत लोकं आता भाजपला मतदान करणार नाहीत हे त्यांना समजून चुकले आहे. या राज्यात भाजप संपले तर पुढच्या राष्ट्रपती निवडणुकीत भाजप विचारांचा राष्ट्रपती होणार नाही या काळजी आणि प्रचितीपोटी हे कृषी कायदे मागे घेतल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केला. तर हे लोकं खोटं बोलून सत्तेत आले आहेत. हे आत्मघाती लोक असून त्यांच्यावर कोणाचा विश्वास ठेवत नसल्याने ते आपलीच पाठ थोपवून घेत असल्याचा टोलाही पटोले यांनी यावेळी लगावला.
दरम्यान कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक ते बैल बाजार परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेत नाना पटोले हिरीरीने सहभागी झालेले पाहायला मिळाले. यावेळी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ, महागाई आदी धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश सचिव ब्रिज दत्त, संतोष केणे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी, युवक काँग्रेस अध्यक्ष मनिष देसले, शकील खान यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.