केडीएमसी निवडणूकीबाबत स्थानिक नेतृत्वाच्या स्वबळाच्या मागणीला ‘रेड सिग्नल’
कल्याण दि. 25 ऑक्टोबर :
आम्ही सरकारमध्ये एकत्र काम करतोय, एकत्र सरकारमध्ये राहायचं आणि वेगळं वागायचे आमचे धोरण नाही. महाविकास आघाडीमधील पक्ष जिथे जिथे एकत्रीत राहतील त्याला प्राधान्य देणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कल्याणात बोलताना व्यक्त केले. कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील यांनी हे मत व्यक्त करत केडीएमसी निवडणुकीसाठी स्थानिक नेतृत्वाकडून केल्या जाणाऱ्या स्वबळाच्या मागणीला एकप्रकारे ‘रेड सिग्नल’ दाखवला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आघाडी होईल का या प्रश्नावर उत्तर देताना पाटील यांनी सांगितले की आम्ही ज्यावेळी आघाडीची चर्चा करतो त्यावेळी महापौर बसवण्याचा कोणत्याच पक्षाचा आग्रह नसावा. एकत्र येण्यात आम्हाला असे अडथळे निर्माण करायचे नाहीत, बहुमत येईल तेव्हा विचार करू असे सांगत महापौरपदाच्या प्रश्नावर त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की मागील सरकारने कल्याण डोंबिवलीकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र आमच्या सरकारची कल्याण डोंबिवली शहरं ही प्रायोरिटी असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. त्यामुळे उल्हासनगरमधील राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की पप्पू कलानी यांनी आपल्याला मित्र म्हणून बोलवलं होतं त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे सांगत या विषयी अधिक भाष्य करणे टाळले.
या जिल्हा कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.