कल्याण स्टेशनवरील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत झाली कैद
कल्याण दि.18 ऑक्टोबर :
चालत्या मेलमधून उतरण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवर पडलेल्या एका गर्भवती महिलेचा जीव आरपीएफने वाचवला. कल्याण स्टेशनवर सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर या गर्भवती महिलेचे प्राण वाचवणाऱ्या आरपीएफ एस.आर. खांडेकर यांचे कौतूक होत आहे.
आज (सोमवार 18 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चंद्रेश हे त्यांचा छोटा मुलगा आणि 8 महिन्याच्या गर्भवती पत्नीसमवेत कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर थांबले होते. गोरखपूर एक्स्प्रेसची प्रतीक्षा करत असतानाच या प्लॅटफॉर्मवर सिग्नल नसल्याने दुसरी मेल थांबली होती. हीच गोरखपूर एक्स्प्रेस असल्याचे समजून चंद्रेश आपल्या कुटुंबासह त्या गाडीत चढला. गाडीत चढल्यावर त्याने इतर प्रवाशांकडे विचारपूस केली असता ही गोरखपूर एक्स्प्रेस नसल्याचे त्याला इतर प्रवाशांनी सांगितले. मात्र तोपर्यंत गाडी सुरू झाली होती.
त्यानंतरही चंद्रेश गाडीतून व्यवस्थित उतरला. मात्र त्याची 8 महिन्यांची गर्भवती पत्नी गाडीतून उतरण्याचा प्रयत्नांत प्लॅटफॉर्मवर पडली आणि मधल्या गॅपमध्ये जात असतानाच आरपीएफ जवान एस. आर. खांडेकर यांनी तात्काळ धाव घेत तिला फलाटावर खेचून घेतले. त्यामूळे या गर्भवती महिलेचा जीव वाचला. आरपीएफ जवान खांडेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.