कल्याण दि.11 ऑक्टोबर :
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कल्याण डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. तर राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेनेही कल्याणात निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. तर आवाहन करूनही रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा सुरूच ठेवल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आजच्या बंदमध्ये संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होण्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही आज सकाळी शहरातील रिक्षा सुरूच असल्याचे दिसताच शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उतरत उपशहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरू केली. यावेळी काही संतप्त शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना अर्वाच्य भाषेचा प्रयोग करत रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन केले.
दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांची समजूत काढत बाजूला केले. यावेळी शिवसेनेचे मोजकेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते निदर्शांनमध्ये सहभागी झालेले दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.