Home ठळक बातम्या लोडशेडिंग टाळण्यासाठी वीजवापर कमी करा – महावितरणचे ग्राहकांना आवाहन

लोडशेडिंग टाळण्यासाठी वीजवापर कमी करा – महावितरणचे ग्राहकांना आवाहन

 

कोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु*

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद

सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा

मुंबई, दि.10 ऑक्टोबर :
कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३ हजार ३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला असून विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत आणि अन्य स्त्रोतांद्वारे वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून मागणी आणि उपलब्धतेमधील समतोल राखण्यासाठी ग्राहकांनी सकाळी ६ ते १० तसेच सायंकाळी ६ ते रात्री १० च्या दरम्यान काटकसरीने वीजवापर काटकसरीने करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ, नाशिक येथील प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ – चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

विजेच्या मागणी आणि उपलब्धतेमधील सध्याची तूट 3 हजार 300 मेगावॅटपर्यंत पोहोचली असून ती भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दरही महाग होत आहेत. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारेही वीज उपलब्ध करण्यात येत आहे.

कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) शनिवारी महावितरणकडून १७ हजार २८९ मेगावॅट इतक्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात आला. तर गेल्या २४ तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्याने विजेच्या मागणीत घट झाली. तर आज (रविवारी) सकाळी ११.३० वाजता राज्यात १८ हजार २०० मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ८०० मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.

कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी आणि पुरवठा याचा समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करण्याचे आवाहन आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत वीजवापर कमी झाल्यास तूट कमी होईल आणि भारनियमन करण्याची गरज भासणार नसल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा