डोंबिवली दि.28 सप्टेंबर :
आयपीएल (ipl) अर्थातच इंडियन प्रीमियर लीग (indian premier league) या क्रिकेट स्पर्धेतील मॅचवर सट्टा घेणाऱ्या 3 बुकींना लोढा पलावा येथून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सिमकार्ड असणारे 6 आणि सिमकार्ड नसलेले 17 मोबाईलसह 7 लाख 65 हजरांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
लोढा पलावाच्या कॅसारिओ गोल्ड सोसायटीत काही इसम आयपीएलवर बेकायदेशीररित्या सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आयपीएलमधील सनराईज हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स संघाच्या क्रिकेट मॅचवर हा सट्टा घेण्यात येत होता. त्याचवेळी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून रितेश कुवरप्रकाश श्रीवास्तव, कुणाल बबनराव दापोडकर आणि निखिल फुलचंद चौरसिया या तिघा बुकीं ऑपरेटरला ताब्यात घेतले.
त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा तसेच भादविनूसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी याबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
ही कारवाई कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन बाबासाहेब गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, वडणे, पोलीस हवालदार संजय पाटील, देवरे, पोलीस शिपाई ऋषीकेश भालेराव, बडगुजर, पोलीस नाईक लोखंडे, कुरणे आदींच्या पथकाने केली.