माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतील उद्यानाचा लोकार्पण सोहळा
कल्याण दि.4 सप्टेंबर :
महाविकास आघाडीने गेल्या दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात विकासासाठी एक रुपयाही पैसा निधी दिला नसून हाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामातील फरक असल्याची टिका केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे.
कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यामार्फत आणलेल्या विशेष निधीतून मंजूर स्व. लक्ष्मीबाई सिताराम कारभारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
जनतेच्या प्रती समर्पित भावनेने भाजप काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कल्याण पश्चिमेसाठी नरेंद्र पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणला. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये येऊन 2 वर्षे व्हायला आली तरी साधा एक रुपाचा निधी या सरकारने दिलेला नाही. येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवली महापालिका आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहीजे. दिल्लीत आपलेच सरकार कायमस्वरूपी राहणार आहे. महाराष्ट्रातही आपलेच सरकार येणार असून कल्याणातही आपले सरकार काय येईल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले.
दरम्यान या उद्यानात ओपन जिम, मॉर्निंग वॉकसाठी जॉगिंग ट्रॅक आणि जेष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विकसित केलेली ही उद्याने आरोग्यासाठीही पूरक असल्याचे कपिल पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, माजी नगरसेवक रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, सचिन खेमा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.