कल्याण दि.25 ऑगस्ट :
कल्याणात काल (मंगळवारी 24 ऑगस्ट 2021) शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये झालेल्या राजकीय धुरळ्याची धग अद्याप ताजी आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटणाऱ्या आपापल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्याचे जोरदार पडसाद काल कल्याणात पहायला मिळाले. यावेळी भाजप शहर कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडून तर शिवसेनेच्या या तोडफोडीचा एकहाती विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा भाजपने आज सत्कार केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर काल संपूर्ण महाराष्ट्रासह कल्याणातही जोरदार पडसाद उमटलेले दिसून आले. कल्याणात तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट भाजप शहर कार्यालयावर चालून जात दगडफेक करत कार्यालयाच्या काचा फोडल्यासह त्याला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी शिवसेनेचे अमोल गायकवाड यांनी आपल्या हातानेच कार्यालयाची काच फोडली. याबद्दल शिवसेनेच्या कल्याण शहर मध्यवर्ती शाखेत अमोल गायकवाड यांचा महानगरप्रमूख विजय साळवी, उपशहर प्रमूख हर्षवर्धन पालांडे आदी सेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
तर शिवसेनेच्या या हल्ल्याचा भाजपच्या केवळ 2 पदाधिकाऱ्यांनी ठामपणे विरोध केला. त्याबद्दल भाजप कल्याण जिल्हा कार्यलयात प्रताप टूमकर आणि वैभव सावंत या दोघांचा भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. आमदार गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.