कल्याण दि.27 जुलै :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळे गावातील मुख्य रस्त्याची गेल्या 5 वर्षापासून दुरावस्था असून रस्त्याचे काम मंजूर होऊनही तो केला जातनसल्याविरोधात कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आज अनोखे आंदोलन केलेलं पाहायला मिळाले. आज असलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आधी होम-हवन करत आणि त्यानंतर रस्त्यात ठाण मांडून आमदार गणपत गायकवाड यांनी सरकारचा निषेध केला.
या रस्त्याच्या डागडुजीसंदर्भात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावाही केला आहे. मात्र अद्यापही रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून नागरिक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहेत. याच्या निषेधार्थ आमदार गणपत गायकवाड यांनी रस्त्यातच बसून सरकारविरोधात घोषणा देत अंदोलन केले.
यावेळी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेचा निषेधही नोंदवत शिवसेनेच्या नेत्यांकडून जाणुन बुजून आपली कामे अडवली जात असल्याचा आरोपही केला. या आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.