कल्याण -डोंबिवली दि.23 जुलै :
ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून बारवी धरणात आतापर्यंत 64.75 टक्के पाणीसाठा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काल 22 जुलै रोजी बारवी धरणात 50 टक्के साठा झाला होता. त्यामध्ये 3 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी बारवी धरणात सुमारे 46 टक्केच पाणीसाठा होता.
सध्या बारवी धरणाची पाणीपातळी 67.99 मीटरपर्यंत पोहोचली असून धरणाची एकूण पाणीपातळी 72 मीटर इतकी आहे. तसेच बारवी धरणातून ठरवून पाणी सोडले जात नाही. याठिकाणी असणाऱ्या स्वयंचलित दरवाज्यातून आपोआप पाण्याचा विसर्ग होत असतो. मात्र अद्याप अशाप्रकारे याठिकाणहून पाण्याचा विसर्ग होत नाहीये.
बारवी धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने लोकांनी कोणत्याही खोट्या -चुकीच्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आणि शहानिशा न करता कोणतेही मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहन एलएनएनतर्फे करण्यात येत आहे.