कल्याण – डोंबिवली दि.22 जुलै :
मागील चार-पाच दिवसांपासून पडत असणारया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी उल्हास नदीकिनारी असलेल्या केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण आणि उदंचन केंद्रामध्ये गुरुवारी पहाटे रोजी उल्हास नदीचे पाणी शिरल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
ही केंद्र बंद असल्यामुळे संपूर्ण ‘अ’ प्रभाग, ब प्रभागातील बिर्ला कॉलेजच्या बाजूच्या परिसर आणि वालधुनी भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर मोहीली उदंचन केंद्रातील पाणीपुरवठा बंद केल्याने डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम भागांचा पाणीपुरवठा पहाटे 3.00 वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, क प्रभागक्षेत्र परिसरात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आणि मोहिली उदंचन केंद्रामध्ये साचलेले पाणी ओसरल्यानंतर आवश्यक ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले आहे.