कल्याण-डोंबिवली दि.9 जुलै :
कोवीड साथीच्या बिकट परिस्थितीत महापालिका रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या कोविड रुग्णांचे आशिर्वाद हेच आपले सर्वांत मोठे अवॉर्ड असल्याचे भावनिक उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटरच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून महापालिकेत आयोजित छोटेखानी सत्कार समारंभात ते बोलत होते.
महापालिकेतील इंजिनियर्स, डॉक्टर्स इतर अधिकारी, कर्मचारी वर्गाने एकत्रितरीत्या टीम म्हणून केलेल्या कामामुळे महापालिकेला आज राष्ट्रीय पातळीवरील covid-19 इनोव्हेशन अवॉर्ड प्राप्त झाले. परंतु आपल्या रुग्णालयातुन बरे झालेल्या रुग्णांचे आशीर्वाद हेच खरे अवॉर्ड असून सर्वांचे काम हे कौतुकास पात्र आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने अभिमान वाटावा असेच काम केल्याची शाबासकी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
“अभियंतांचे मनोबल वाढवण्यासाठी या छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन”
कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत इंजिनिअर टीम आणि इतर सर्वांनी उत्तमरित्या काम केल्याने महापालिकेच्या जम्बो फॅसिलिटीचे सर्वत्र कौतुक झाले. त्यामुळे हॉस्पिटल मॅनेजर म्हणून काम केलेल्या अभियंतांचे मनोबल वाढवण्यासाठी या छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन केल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी दिली. सर्व अभियंताना काम करण्यासाठी आयुक्त यांच्या कणखर नेतृत्वाची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची खूप मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर अधिकारी किंवा कर्मचारी कोवीड पॉझिटिव झाल्यावर पालिकाआयुक्तांनी स्वतः लक्ष देऊन काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा जीव वाचला. ही।आमच्यासाठी फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट असल्याचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा म्हणाले.
“कोवीडच्या कितीही लाटा आल्या तरी आम्ही सज्ज”
आयुक्तांनी काम करण्यासाठी आमच्यात एनर्जी निर्माण केली. एकसंघ टीम बांधण्याचं सूक्ष्म नियोजन केल्याने यशस्वीरित्या कोवीडमध्ये काम करता आलं. कोवीडमध्ये काम करण्यास अनेकांचा सुरुवातीस विरोध होता. परंतु आयुक्तांनी केलेल्या मार्गदर्शन आणि दाखवलेल्या विश्वासामुळे हे काम करता आलं. आता अजूनही कोवीडच्या कितीही लाटा आल्या तरी आम्ही सज्ज असल्याचे महापालिका सचिव संजय जाधव आपल्या भाषणात म्हणाले. कोविडच्या पहिल्या लाटेत प्रारंभी अनंत अडचणी आल्या. परंतु पालिकाआयुक्तांचा पाठिंबा असल्याने सर्व सुरळीत झाल्याचे उपअभियंता किरण वाघमारे यांनी सांगितले.
“महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार”
या छोटेखानी कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील, कोवीड कालावधीत आर.आर. रुग्णालय, निऑन रुग्णालय, होलीक्रॉस या रुग्णालयांचे नियोजन करणारे कार्यकारी अभियंता तरुण जूनेजा, कोविड रुग्णालयांच्या उभारणीसाठी काम करणारे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, साई निर्वाण कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके, टाटा आमंत्राचे हॉस्पिटल मॅनेजर तथा कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, प्रमोद मोरे, सावळाराम कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता किरण वाघमारे, पाटीदार कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता सुरेंद्र टेंगळे, वसंत व्हॅली, आर्ट गॅलरीचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता भालचंद्र नेमाडे, जिमखाना कोविड समर्पित रूग्णालयाच्या हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता रोहिणी लोकरे, रुक्मिणी प्लाझा रुग्णालयाचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उप अभियंता श्रीकांत मुंडे, सर्व कोविड सेंटरमध्ये विद्युत यंत्रणा उभारणारे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सर्व कोविड रुग्णालयातील खानपान व्यवस्था सांभाळणारे महापालिका सचिव संजय जाधव, सहा.जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, शहर अभियंता यांचे स्वीय सहाय्यक भागवत यांचा यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.